राजकारण

माझा घातपात होऊ शकतो! आमदार नितीन देशमुख यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

कोला – जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील ६९ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.

ही स्थगिती उठविण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणाऱ्या शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत माझा घातपात होऊ शकतो, असे म्हणत, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर सडकून टीका केली.

बाळापुर मतदार संघातील खारपाणपट्ट्यात समाविष्ट होणाऱ्या ६९ गावांमध्ये गोड्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना किडनीचे विकार जडले असून त्यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाण धरणातून २२० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. योजनेचे काम ६० टक्के पूर्ण झाले असताना भाजपच्या काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी १० एप्रिल पासून अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रेला प्रारंभ केला. ही यात्रा २० एप्रिल रोजी नागपूरच्या सीमेवर पोहोचली असतानाच आमदार देशमुख यांच्यासह असंख्य शिवसैनिकांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार देशमुख यांना पोलीस व्हॅनमध्ये तसेच इतर शिवसैनिकांना लक्झरी बसेसद्वारे अकोला शहरात दुपारी परत आणले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.

पालकत्व घेतले म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो! –
देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खारपाणपट्ट्यात लहान मुले, गर्भवती माता, व वयोवृद्ध नागरिकांना क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक प्रकारचे विकार जडले आहेत. गोड पाण्याविना या भागातील नागरिकांचे अतोनात हाल होत असल्यामुळे तुम्ही सुद्धा खाऱ्या पाण्याची चव घ्यावी व त्यानंतर स्थगिती उठवावी, अशी आमची भावना होती. फडणवीस यांनी पालकत्व घेतल्यामुळेच आम्ही तीव्र उन्हात अकोला ते नागपूर पायी यात्रा काढली. ते आमच्या भावना समजून घेतील अशी अपेक्षा होती; परंतु पालकमंत्र्यांनी आमची भेट घेण्याचे औचित्य न दाखविता पोलीस बळाचा वापर करून आम्हाला ताब्यात घेतले. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री अत्यंत असंवेदनशील व अहंकारी वृत्तीचे असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी यावेळी केला.

अन्यथा हीच संघर्ष यात्रा दिल्ली पर्यंत घेऊन जाणार –
अकोला शहरात अंध पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या अंध पत्नीवर तीन वेळा बलात्कार केला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या चार मुलींचे त्याच शाळेतील दोन नराधम शिक्षकांकडून लैंगिक शोषण केले जाते. पारस येथील मंदिरात आरती करत असताना वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून त्यामध्ये सात भाविकांचा मृत्यू होतो. जिल्ह्यात अशा घटना घडत असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. गृहमंत्री म्हणून ते सपशेल अपयशी ठरल्याची टीका करीत, पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती आठ दिवसात न हटविल्यास ही संघर्ष यात्रा थेट दिल्लीपर्यंत घेऊन जाणार असल्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला.

अकोल्यात शिवसैनिकांचे शक्ती प्रदर्शन –
आमदार देशमुख यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी
जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पोलीस व्हॅनमध्ये आमदार देशमुख अकोल्यात आले असता पोलिसांचा ताफा अडवत शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button