“आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तीव्र फैरी झडताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीचे नेते वज्रमूठ सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करताना पाहायला मिळत असून, शिंदे गट तसेच भाजपचे नेते वज्रमूठ सभेवर टीका करत आहेत. यातच आता आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आगामी १५ दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे. या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघाले आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे, हे सरकार टिकत नाही
प्रत्येकजण आपापली गणिते मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. मी मागे एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, माझ्याकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटील यांनी चढ्या भावाने बेफाम खरेदी केली. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध यांचा समावेश आहे. २ लाख रुपयांच्या व्हेंटिलेटरची खरेदी १५ लाखात करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यापेक्षा गुलाबराव पाटील हे प्रत्येकावर दबाव आणून खरेदी करुन घेत होते. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.