जिला

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या! माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची पालकमंत्री महाजन यांच्याकडे मागणी

नांदेड दि. १९ अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी व आढावा बैठकीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीतील चर्चेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना नुकसानाची माहिती दिली तसेच लेखी निवेदनही दिले.

 

 

या निवेदनाद्वारे त्यांनी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीकडे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, लोहा, कंधार, मुखेड या तालुक्यात दि.१६ व १७ मार्च असा दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वारा व झालेली गारपीट यात शेतकऱ्यांच्या केळी, टरबूज, खरबूज, भाजीपालासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी रस्त्यावर आला आहे. या सोबतच कंधार, लोहा व मुखेड तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतीच्या नुकसानीसह पाळीव जनावरे व घरांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही. त्यासोबतच टरबूज, खरबूज, भाजीपाला, हळद या पिकांना विमा संरक्षण नाही. अशा वेळी अचानकपणे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या या शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांना केळी या पिकासाठी १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान वाऱ्याचा वेग तासी ४० किमीच्या वर गेल्यास हेक्टरी ७० हजार रुपये देणे बंधनकारक आहे. स्कायमेटच्या नोंदीनुसार नांदेड जिल्ह्यात हा वेग ५५ ते ६० किमी असा नोंदविण्यात आला आहे. तसेच याच भागात मोठी गारपीट झाली आहे. गारपीटीचे ४६ हजार ६६७ रुपये मिळणे गरजेचे आहे. या दोन्ही रक्कमेची एकत्रित बेरीज करता प्रति हेक्टरी शासनाच्यावतीने १ लाख १६ हजार ६६७ रुपये तात्काळ मिळणे गरजेचे आहे. हाच निकष पिक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा लावण्यात यावा.

 

अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनानूसार मोठ्या प्रमाणात शेड नेट व पॉलीहाऊसची निर्मिती केली आहे. त्यांना तसे शासनाचे अनुदानही मिळाले आहे. परंतु हे शेडनेटवरील नेट व पॉलीहाऊसवरील पॉलीफिल्म वाऱ्याच्या अतिवेगामुळे उडून गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले असून त्यांना अनुदानाच्या रुपाने पुन्हा एकदा नेट शेडवरील नेट व पॉलीहाऊसवरील पॉलीफिल्म बसविण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत देणे आवश्‍यक आहे. केळी पिक वगळता इतर पिकांसाठी एनडीआरएफ निकषानूसार जास्तीत जास्त १८ हजार रुपये मदत मिळू शकते, परंतू प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी कमीत कमी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button