देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत
सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केलं.
देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात आहे. कायदा मंत्री किरण रिजीजूंचा न्यायालयावर दबाव आहे.
कोकणातील जनता उद्धव ठाकरेंसोबत
5 मार्चला खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली त्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या मागे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नसल्याचे राऊत म्हणाले. आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. त्यांच्या या सभेबाबत राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी राऊत बोलत होते.
राहुल गांधी यांनी माफी का मागावी, राऊतांचा सवाल ?
न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात अशी टीका संजय राऊतांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हुकूमशाही विरोधात लंडनमध्ये आवाज उठवला आहे, म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे राऊत म्हणाले. संसदेत जे काम चाचलं आहे, त्याबाबत राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी जर भूमिका मांडली असेल तर त्यांनी माफी का मागावी असा सवाल संजय राऊत यांनी केला. राहुल गांधी यांनी माफी मागण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेडमध्ये सभा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.