आपदग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान 25 हजार मदत द्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण; जिल्हाधिकाऱ्यांसमवेत घेतला आढावा
नांदेड,दि.17 (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हयात दि. 16 रोजी अचानक झालेली गारपीट व सुसाट सुटलेला वारा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरे दगावणे, घरांवरील पत्रे उडून जाणे यासह शेतीतील सर्वच उभी पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. अशावेळी या सर्व आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रति हेक्टरी किमान 25 हजार रुपयांची तत्काळ मदत शासनामार्फत द्यावी अशी आग्रही भूमिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे घेतली. अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या समवेत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यात झालेल्या गारपीटीची व नुकसानीची माहिती मिळताच अधिवेशन असतानासुध्दा ते आज मुंबईहून नांदेड येथे आले. त्यानंतर त्यांनी ज्या भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा पाटणूर, बारड, पांढरवाडी,डोंगरगाव, शेंबोली, निवघा, इजळी, मुगट,शंखतीर्थ, आमदुरा, वासरी या गावांचा त्यांनी दौरा केला. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या समवेत नुकसानीचा एका बैठकीतून आढावा घेतला. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा कृषी अधीक्षक रवीशंकर चलवदे काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी निलेश देशमुख बारडकर, किशोर देशमुख बारडकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पीक नुकसानीची वास्तववादी माहिती मिळण्यासाठी ड्रोनद्वारे पाहणी करण्याची प्रशासनास सूचना केली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर,लोहा, मुखेड,हदगाव या तालुक्यातील 7 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून 11 हजार 09 शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ पोहोंचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातील काही शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता, तर काहीनी आपल्या पिकांचा विमा काढला नाही. त्यासोबतच टरबूज, खरबूज, हळद, भाजीपाला या पिकांना पीकविम्याचे कवच नसते व अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा असेल किंवा नसेल तसेच पीकविम्याचे ज्या पिकांना कवच नाही अशा सर्वच नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली.
अवकाळी पाऊस व वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या पडझड झालेल्या व पत्रे उडून गेलेल्या घरांना एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारी 95 हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. या अवकाळी पावसात पाटणूर येथील तांदुळवाड यांचे घर, गिरीमहाराज यांचे घर, बारड येथील देवीरोडवरील 20 दुकानांचे नुकसान तसेच मुगट येथील वडारवाडा वस्तीतील झालेल्या नुकसानीचा यामध्ये समावेश आहे.
या अवकाळी पावसात एमएससीबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक घेवून वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा. शेडनेट व पॉली हाऊस यावर लावण्यात आलेली नेट व पॉलीफील्मचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना विशेष बाब म्हणून तत्काळ मदत करावी. दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करुन तत्काळ मदत करण्यात यावी. त्यासोबतच अर्धापूर व मुदखेड भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतल्या जाते, यावर्षी हळद काढणीनंतर ती शेतामध्ये शिजवून ठेवण्यात आली होती. अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.याचा पंचनामा करुन हळद उत्पादक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करावी असेही यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवावे असेही त्यांनी सांगितले.