काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनासाठी चव्हाणांना मोठी जबाबदारी, पटोलेंना संधी, थोरातांचे नाव नाही
अशोक चव्हाण यांच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय व्यवहार उपसमितीचे निमंत्रक पद देण्यात आले आहे. तसेच मसुदा समितीमध्येही त्यांचा
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रायपूर येथे नियोजित राष्ट्रीय अधिवेशनासाठी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय व्यवहार उपसमितीचे निमंत्रक पद सोपवण्यात आले आहे. सोबतच मसुदा समितीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंनाही संधी देण्यात आली असून बाळासाहेब थोरात यांचे नाव मात्र कुठेच दिसत नाही.
येत्या २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान रायपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे यांनी गठीत केलेल्या विविध समित्यांची यादी आज राष्ट्रीय महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली. या समित्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचाही समावेश आहे.
अशोक चव्हाण यांच्या समवेत खा. मुकूल वासनिक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील मसुदा समितीचे सदस्य असतील. वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीचे अध्यक्ष पदही देण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी केंद्रामध्ये याच विभागाचे मंत्रीपद सांभाळले होते.
अशोक चव्हाण निमंत्रक असलेल्या राजकीय व्यवहार उपसमितीमध्ये महाराष्ट्रातून माजी मंत्री नसिम खान व आ. यशोमती ठाकूर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. आर्थिक व्यवहार उपसमितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आ. प्रणिती शिंदे व माजी मंत्री आ. नितीन राऊत यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांना शेतकरी व कृषी उपसमितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
खा. मुकूल वासनिक अध्यक्ष असलेल्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण उपसमितीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे व आ. विजय वडेट्टीवार हे सदस्य असतील. युवक, शिक्षण व रोजगार उपसमितीमध्ये माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड यांना सदस्य करण्यात आले आहे.