ग्राहक पंचायतशी समन्वयाने ठेवूनच कार्य करणार अन्न व औषध सहाय्यक आयुक्त कोकडवार यांची ग्वाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे समन्वय बैठक उत्साहात
नांदेड ः अन्न व औषध विभाग नांदेड येथील ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेड शाखेशी समन्वय ठेवून यापुढे आपले कार्य सुरु राहील, अशी ग्वाही ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेड शाखेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आयोजित समन्वय बैठकीत अन्न व औषध सहाय्यक आयुक्त रा. दि. कोकडवार यांनी दिली. ते 7 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध सहाय्यक आयुक्त कार्यालयात समन्वय बैठकीत बोलत होते.
अन्न सुरक्षा आयुक्त कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेड शाखेसोबत समन्वय बैठक दि. 7 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त रा. दि. कोकडवार व स. ना. चट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत ग्राहकांची अन्न व औषध भेसळबाबतच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्राहकांशी हितगूज साधण्यासाठी शहराच्या विविध भागात मेळावे घेऊन जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. तसेच दर तीन महिन्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जि. शाखा नांदेड सोबत समन्वय बैठक घेण्याचे ठरले. तसेच एप्रिल महिन्यात दीपनगर येथे महिलांच्या प्रबोधनार्थ अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम घेण्याचे ठरले. वेळोवेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेड शाखेशी समन्वयाने आपले कार्य करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष अरविंद बिडवई, विभाग संघटक बालाजी लांडगे, महानगर संघटक प्रशांत वैद्य, रमाकांत घोणसीकर, प्रा. संध्या खरवडकर, अॅड. दीपाली डोणगावकर, बाळासाहेब पानसे आदींची उपस्थिती होती.