हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनाही दिला इशारा
पावनमारी गावासाठी मंजूर झालेल्या रस्त्याचा दीड कोटींचा निधी पळवून नेत असाल तर खपवून घेणार नाही -सरपंच प्रल्हाद पाटील टेंभूर्णीकर
हिमायतनगर,अनिल मादसवार| आमचा निधी कोणी पळवून नेत असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही.. यासाठी मंजूर करण्यात आलेला पावनमारी गावचा रस्ता झाला पाहिजे…या रस्त्याला नंबर नाही असे सांगून मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात आहे. अशी नाराजी वजा संताप व्यक्त करत गावकर्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन रस्त्याची मागणी केली आहे. रस्ता देता येत नसले तर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पावनमारी (ता. हिमायतनगर) येथील सर्व नागरिक गाव जाळून तहसील कार्यालय हिमायतनगर समोर सहकुटुंब आत्मदहन करून गाव बेचिराग करणार असल्याचा इशाराही टेम्भूर्णी पावनमारी गावकऱ्यानी निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालयात नसल्याने गावकर्यांनी अर्धा तास कार्यालय परिसरात ठिय्या मांडल्या. यावेळी नायब तहसीलदार ताडेवाड आल्यानंतर त्यांना मागणीचे निवेदन सोपविण्यात येऊन गेल्या ५० वर्षांपासून प्रलम्बित मागणी करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्यायेण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. वेळोवेळी वर्तमान पत्रात या संदर्भाच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा विकास निधी मंजूर केला. हा मंजूर रस्ता इतरत्र वळविण्यात येत असल्याचे समजल्यानंतर आमचा मंजूर रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारीकर विचारात आहेत.
नांदेड जिल्ह्यातील पावनमारी हे गाव गट ग्रामपंचायत टेंभूर्णी अंतर्गत जोडलेली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सुद्धा हे गाव मुख्य रस्त्याशी किंवा ग्रामपंचायत टेंभूर्णी कडे पक्क्या रस्त्याने जोडण्यात आले नाही. या गावाची ग्रामपंचायत टेंभूर्णी, राशन दुकान टेंभूर्णी उप आरोग्य केंद्र विरसनी जि. प. पंचायत समिती मतदान केंद्र टेंभूर्णी येथे आहे. तर तलाठी सज्जा खडकी, विधानसभा / लोकसभा मतदान केंद्र खडकी, जवळचे रेल्वे स्टेशन खडकी व मुख्य बाजारपेठ हिमायतनगर आहे. तरी हे गाव टेंभूर्णी किंवा खडकी कडे अद्याप पक्क्या रस्त्याने जोडले नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, उप जीविका या मुलभूत सोई पासून गाव कोसो दूर आहे.
यावर्षी २०२३ – २४ च्या आर्थिक वर्षात या गावासाठी तीस लक्ष रुपये चा निधी रस्त्यासाठी टाकण्यात आला. ते पावनमारी फाट्यापासून टेंभूर्णी कडे ५०० मीटरचे काम केले असून, अर्धवट अवस्थेत आहे. या कामावर तक्रार झाल्यामुळे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा निधीचे काम नंबर नसल्याकारणाने पावनमारी गावाचे नाव वापरून किरमगावकडे करण्यात येत आहे. जे कि तो रस्ता वाहतुकीस नसून साधी पाऊल वाट आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व पदाधिकारी सूडबुद्धीने रस्त्याला नंबर नाही म्हणून हे काम दुसरीकडे टाकत आहेत.
सर्व सामान्य जनतेसाठी नियम व अटी लागू होतात पण अधिकारी व पदाधिकारी साठी कोणतेच नियम लागू नसतात का..? जर या गावातील नागरीकाना रस्ताच द्यायचा नसेल तर ते गाव बेचिराग करून गावाला आग लाऊन सर्व नागरिक तहसील कार्यालय येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी आत्मदहन करतील याची योग्य ती दखल प्रशासनाने घ्यावी. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मा. कार्यकारी अभियंता साहेब, जि. प. बांधकाम विभाग भोकर, मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन हिमायतनगर आणि राजकीय नेतेमंडळींसह पत्रकाराना देण्यात आले आहेत. या निवेदनावर सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, टेंभुर्णी / पावणमारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील रपंच व समस्त गावकरी पावनमारी व टेंभुर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. किमान गावकर्यांनी दिलेल्या आत्मदहनाचा इशाऱ्यानंतर तरी गेंडयाची कातडी पांघरलेले अधिकारी व राजकीय पुढारी भारताच्या अमृत महोत्सवाच्या कार्यकाळात तरी येथील रस्ता करू देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.