सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट; वृक्ष लागवड व शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
नांदेड,२३- नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी उमरी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला. त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजातील अडचणी, सद्यस्थिती आणि आगामी योजनांबद्दल चर्चा केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पंचायत समिती परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
दौऱ्या दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दुर्गानगर गावास भेट दिली. यावेळी त्यांनी जल जीवन मिशन योजनेची कामे, घरकुल बांधकाम, दलित वस्ती योजनेतील रस्त्याची पाहणी केली. तसेच अंगणवाडीस भेट देवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणाऱ्या अर्जांची पाहणी करुन येथील महिलांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, ज्यात वह्या, पेन, पेंसिली आणि इतर आवश्यक साहित्यांचा समावेश होता. या वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत झाली आहे. दौऱ्या दरम्यान गट विकास अधिकारी व्ही.बी. आडबलवार, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व गावकरी यांची उपस्थिती होती.