जिला

24 तासांत 24 रुग्णांचा संशयास्पद मृत्यू:मृतांत 12 नवजात, नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना; औषधींचा तुटवडा कारणीभूत

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील 24 तासांत 24 मृत्यू झाल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. कहर म्हणजे या मृतांत 12 नवजात मुलांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी या प्रकरणी बहुतांश मृत्यू बाह्य रुग्णांचा झाल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आता घटनेचे गांभीर्य पाहून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, नांदेडच्या सरकारी रुग्णालयात गत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 12 जणांचा मृत्यू सर्पदंश व विषबाधेमुळे झाल्याची माहिती आहे. औषधी व मनुष्यबळाचा तुटवडा ही या मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचा दावा केला जात आहे.

अधिष्ठातांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न

या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह लगतच्या परभणी, हिंगोली, यवतमाळ व तेलंगणा भागातील शेकडो रुग्ण येतात. त्यातच ही घटना घडल्यामुळे या भागात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी मृतांमध्ये बाह्य रुग्णांचा सर्वाधिक समावेश असल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, नांदेडमध्ये जी रुग्णालयातील घटना घडली आहे. चोवीस तासांत चोवीस लोकांचा बळी गेला. त्यामुळे सरकार आणखी किती लोकांचा जीव घेणार? असा प्रश्न आहे. ठाण्याच्या घटनेनंतर देखील सरकार जागे झाले नाही. अनेक शासकीय रुग्णालयात रुग्णांचा जीव जात आहे. रुग्णांना अजूनही औषधी मिळत नाही. शासकीय रुग्णालयात ओषध मिळत नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून औषधांची खरेदी रखडली आहे. संबंधित घटनेतील लोकांवर त्वरीत कारवाई सरकारने केलीच पाहिजे, मात्र, या सरकारने देखील या घटनेमागचे उत्तर द्यायला हवे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रुग्णालयावर मोठा ताण

नांदेड परिसरात एकही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे या भागातील सर्वच रुग्णांचा ओढा या रुग्णालयाकडे असतो. मागील 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 6 मुले व 6 मुली अशा एकूण 12 नवजात मुलांचा समावेश आहे. इतर 12 जणांचा प्रौढ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी दिली.

सर्पदंशावरील औषधींचा तुटवडा

प्रस्तुत रुग्णालयात किरकोळ आजारांसह प्रामुख्याने सर्पदंश झालेले रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. सर्पदंशावरील औषधी मुंबईच्या हाफकिन संस्थेकडून मागवली जाते. सध्या औषधांचा तुटवडा आहे. पण रुग्णांची स्थिती पाहून स्थानिक पातळीवर औषधांची तजवीज करून उपचार केला जातो. पण रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णसेवेवर मोठा ताण येत आहे, असे वाकोडे म्हणाले.

ठाण्यातही घडली होती अशी घटना

उल्लेखनीय बाब म्हणजे ठाण्यातील कळवा रुग्णालयात 36 तासांत 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याचे राजकीय पटलावर तीव्र पडसाद उमटले होते. विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकामासाठी बंद करण्यात आल्यामुळे तेथील रुग्णांचा अतिरिक्त ताण कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडला होता. त्यातून ही घटना घडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button