मराठवाडा

आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तीव्र निषेध

 

परभणी / दि. 01 – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 02 तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे.

 

ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची पुरोगामी विचारधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.

 

पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली. त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे. आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे.

 

शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सतेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. या आंदोलनात परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) माजी आ. अॅड. विजयराव गव्हाणे, शहर जिल्हाध्यक्ष जाकेर अहेमद खॉन, शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे, युवक जिल्हा अध्यक्ष रितेश काळे, युवक शहरध्यक्ष अतिष गरड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख असेफ, अर्बन सेल शहर जिल्हाध्यक्ष प्रभाकर लंगोटे, विधानसभा अध्यक्ष अजय गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर प्रवक्ता रहेमान खान पठाण, सा.न्या. वि. प्रदेश सरचिटणीस डि. आर. तुपसुंदर, जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी, राज शेलार, सा.न्या. वि. शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी नेटके, शहर उपाध्यक्ष भली शेख, शहर प्रवक्ता शेख अहेमद शेख हसन, विशेष निमंत्रीत सदस्य तथा माजी नगर सेवक – सभापती पाशा कुरेशी, अली खॉन मोईन खॉन, अतिक अहेमद इनामदार, इमरान सैन, नदीम काजी, अखिल काजी, शेख फहाद शालीमार, अब्दुल कलीम (बॉस), शहर सरचिटणीस गंगाधर यादव, अनिकेत मकरंद, शहर संघटक शेख रईस (मौलाना), शहर सचिव शेख शाकेर, सह सचिव अंगद गिराम, शहर प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब राम स्वामी, शहर कार्यकारिणी सदस्य् मोहन कांबळे, शेख सलमा, सय्यद रऊफ अतार,

 

मो. शफी बागबान, यशस्वीनी अभियानच्या श्रीमती वनिता चव्हान, मानिक भदरगे, रेहाना बेगम शेख ईरफान, शहर संघटक किशोर क्षिरसागर, शेख अक्रम, युवक उपाध्यक्ष शिवंम कोरडे, अर्बन सेल महिला समनवयक, श्रीमती मंगल वायवळ, पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते बाळकृष्णा बायस, सुर्यकांत चव्हाण, शेख ज्वार, बशीर खाँन, शेख मंसूर, शादुल अन्सारी, साजेद अली, राजु दाभाडे, बशीरभाई दलाल, बालासाहेब झाडे, प्रसाद प्रधाण, बंजरंग कावळे, राजेभाऊ ठाकरे, अनिल झाडे, अभय डुमणे, ईश्वर कोंपलवार, तहाखान पठाण, शफी बागवान, ईलियासभाई, ईनायत उल्ला, शेख फरहान, नदीम पटेल, मुमताज कादरी (बिल्ला) यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे.आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबां सोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजप सोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू.” असे सदरील निवेदनात नमूद केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button