एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांनी आपला जीव गमावला.
छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचं स्वरुप इतकं भयंकर होतं की अग्निशमन दलाला ती विझवायला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या अग्नितांडवात सहा जणांचा नाहक बळी गेला. तर एका श्वानानेही यात जीव गमावला. जेव्हा अग्निशमन दलाचे जवान हे त्या अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तोपर्यंत सारं संपलेलं होतं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत जे सांगितलं त्याने अंगावर काटा उभा राहिल.
अग्नितांडवात मृत झालेल्यांमध्ये एका ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्रिशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (वय ३२), इक्बाल शेख (वय १८), ककनजी (वय ५५), रियाजभाई (वय ३२), मरगुम शेख (वय ३३) अशी मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
छ. संभाजीनरात वाळूज औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष रात्री १ च्या सुमारास अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. पण, आगीचं स्वरुप पाहता ही आग त्याच्या खूप आधीपासून लागलेली असावी, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. आता आग लागल्याने हे लोक तिथे अडकले होते की झोपी गेले होते याबाबतची काही स्पष्टता नाही.
माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठलं. जिथे हे लोक अडकलेले होते तिथपर्यंत वर जाण्याचा जो मार्ग होता त्याला आगीने पूर्णपणे वेढा घातलेला होता. ती आग अग्निशमन दलाने विझवली, पण धूर आणि उष्णता इतक्या प्रमाणात वाढली होती की अग्निशमन दलाच्या जवानांना लगेच वर जाता आलं नाही. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आलं.
ते झाल्यावर जवान हे रांगत रांगत वरच्या मजल्यावर पोहोचले. जेव्हा या जवानांनी खोलीत पाहिलं तेव्हा त्यांना समोर अत्यंत हृदयद्रावक असं दृश्य दिसलं. त्या खोलीत सहा जण मृतावस्थेत दिसले. त्यात एक श्वानही होता. त्याचे पाय वर झालेले होते, तेव्हाच जवानांना कळालं की ते जिवंत नसतील. या फॅक्ट्रीच्या चारही बाजुने आग लागलेली होते आणि हे लोक आत पहिल्या मजल्यावर अडकलेले होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. ही आग कशी लागली याबाबत सध्या काहीही माहिती नसल्याचंही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.