देश विदेश

सांभाळून जा, घरातून निघताना आईने सांगितलं अन् दहाच मिनिटात पोरांच्या मृत्यूची बातमी आली

नागपूर: रोजच्याप्रमाणेच आजही ते दोघे भाऊ-बहीण ठरल्या वेळेला सायकलने निघाले. निघताना आईने ‘सांभाळून जा’, असा नेहमीचा सल्ला दिला. मात्र त्यानंतर दहा मिनिटातच घरी सुमित व अंजलीच्या मृत्यूची वार्ता येऊन धडकली. आईवडिलांचा आक्रोश सुरू झाला. पोटची दोन लेकरं काळाने एकाचवेळी हिरावून घेतल्याने ते आईवडील धाय मोकलून रडत होते. जे ऐकले ते खोटे ठरावे, अशी प्रार्थना ते करीत होते, मात्र जे कळले ते खरे होते. त्यांचा आकांत पाहून जयदुर्गानगर परिसर हळहळला. एक दिवस आधीच कांबळे चौकात दुचाकीवर जाणाऱ्या बहिणींना मिनी ट्रकने धडक दिल्याने मोठ्या बहिणीच्या डोळ्यादेखत लहानीने प्राण सोडले होते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी अपघाताने बहीण-भावाचा जीव घेतला.

सैनी कुटुंब तसे मूळ उत्तर प्रदेशातील कानपूरचे. गेल्या अनेक वर्षांपासून ते नागपूरला जयदुर्गानगर परिसरात वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नन्हेलाल सैनी यांना चार अपत्ये. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगा खासगी काम करतो. १८ वर्षांची अंजली महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ई-सेवा केंद्रातही काम करायची.
नवीनतम स्मार्ट टीव्हीसह सुट्टीचा आनंद स्वीकारा- 55% पर्यंत सूट

कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव लहानगा सुमित जवळच असलेल्या नागेश्वर नगरातील श्रावणी शाळेत दहावीला शिकत होता व सोबत गॅरेजमध्येही काम करायचा. सारीच मुले जमेल तसा कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी. अंजली व सुमित रोजच सायकलने निघायचे. तसेच ते शुक्रवारीही निघाले मात्र काही अंतर जात नाही तोच काळ बनून आलेल्या भरधाव टिप्परने या दोघांनाही चिरडले. चोळामोळा झालेली सायकल, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोघांचे मृतदेह आणि रस्त्यावर सांडलेले टिफीनमधील अन्न हे दृश्य पाहून तेथे उपस्थित प्रत्येकजण हेलावला. सायंकाळी पारडी घाटावर या दोघांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रहिवासी म्हणतात, जड वाहनांवर बंदी घाला!

सैनी कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या भीषण अपघातात त्या कुटुंबाने आपले दोन जीव गमावले. त्यामुळे त्यांना प्रशासनाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे अंकुश भोईते यांनी केली. शहरात जड वाहने भरधाव वेगात धावतात. या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. सकाळी ९ ते ११ या वेळात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सकाळी व सायंकाळी जड वाहनांवर शहरात बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसचे परमेश्वर राऊत यांनी ‘मटा’शी बोलताना केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button