प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवासनिमित्य संविधान संदेश घेवून सायकल यात्रेतून पंतप्रधानांच्या भेटीस रवाना होणार
मुखेड / प्रतिनिधी – येथील हुसेनसाब इब्राहिम निचलकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी 2024 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला साहेब यांच्या भेटीचा सायकल यात्रेद्वारा संकल्प करुन, ते आपल्या प्रवासात संविधान संदेश व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आपला सायकल प्रवास मुखेड जि.नांदेड (महाराष्ट्र) पासून ते नवी दिल्ली (संसद भवन) पर्यंत करणार आहेत. श्री हुसेनसाब निचलकर हे मुखेड येथील एक गरीब कुटुंबातील व्यक्ती असून, ते आपला वंशपरंपरागत व्यवसाय करुन उपजिवीका भागवितात. त्यांचे शिक्षण पदवी पर्यंतचे झालेले असून, त्यांना समाज कार्याची नितांत ओढ असल्यामुळे ते नेहमी नव नवे उपक्रम राबवून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करीत असतात. असेच ते कोरोना 19 मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव भारतातून समूळ नष्ट व्हावा म्हणून, मुखेड पासून आजमेर पर्यंतचा 1400 कि.मी. चा प्रवास त्यांनी सायकल यात्रेद्वारे पूर्ण करुन, सर्वाचे जीवन निरामय व सुखी व्हावे यासाठी त्यांनी महत्वाचे योगदान देवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यात त्यांच्या सहचारीणी आणि त्यांची दोन अपत्ये जैनुल आबेदिन मुलगा व सकिनानुरी मुलगी यांचेही मोलाचे योगदान व सहकार्य असते.
आज ते दिनांक 1 जानेवारी 2024 सोमवारी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पहाटेची 6.30 वा.ची नमाज पडून ते मुखेड येथील रजा चौक मस्जिद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पासून आपल्या सायकल प्रवासास निघणार आहेत. सदरील प्रवास अमरावती मार्ग करीत मध्यप्रदेशातील बैतुल, भोपाळ, शिवपुरी, ग्वालीवर ते हरियाणा गुरुग्राम (सायबर सिटी) करीत नवी दिल्ली (संसद भवन) पर्यंत असा प्रवास करीत आहेत. प्रवासादरम्यात ते भारतीय संविधान आमच्या सर्वांचा अभिमान…! हा संदेश घेवून सर्व भारत वासीयांना एकतेचा संदेश देत एकूण 1320 कि.मी.चा प्रवास सायकलद्वारे करीत ते नवी दिल्ली (संसद भवन ) येथे दिनांक 26 जानेवारी रोजी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला साहेब यांना भेटून प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय संविधान घेतलेले छायाचित्र भेट स्वरुप दोन्ही नेत्यांना देणार आहेत.
तरी त्यांच्या या सर्व कार्यास व त्यांनी करीत असलेल्या सामाजिक, मौलीक कार्यास मा.खा. प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, मा. आ. तुषारजी राठोड साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी अभिनंदन करुन प्रवासास शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच सामाजिक संघटना, सर्व पत्रकार बंधू व अनेक स्तरातूनही शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.