देश विदेश

लाखो रुपये खर्चून गुजरातहून अमेरिकेला जायला निघालेले ‘हे’ 9 जण कुठे गायब झाले?

“जवळपास एक वर्ष झालंय, पण आमच्या भावाचा पत्ता नाही. जेव्हापासून आमचा भावाशी संपर्क तुटलाय, तेव्हापासून आम्ही एकेक दिवस मोजतोय. रात्र रात्र झोप लागत नाही.”

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज येथील वाघपुरा गावचे मूळ रहिवासी असलेले शैलेश देसाई आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 11 महिन्यांपासून त्यांचा भाऊ भरत देसाई (वय वर्षे 35) यांची काहीतरी बातमी येईल याची वाट पाहत आहेत.

शैलेशभाई सांगतात, “आम्ही त्याच्या परतण्याची आशा सोडून दिली आहे. फक्त तो जिथे असेल तिथे सुखरूप असू देत, हीच आमची प्रार्थना आहे. माझ्या भावाची तीन मुलं मला रोज विचारतात, ‘बाबा कधी येणार?’ पण आमच्याकडेही याचं काहीच उत्तर नाही.”

“भरतभाईंशी संपर्क न झाल्याने आम्ही एजंटसोबत संपर्क साधला. पण एजंट वेगवेगळ्या कहाण्या रचून सांगतोय. माझ्या भावाची पत्नी चेतनाबेन यांनी 12 जुलै 2023 रोजी प्रांतिज पोलिस ठाण्यात एजंटांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती.”

भरत देसाई यांनी अमेरिकेचं स्वप्न उराशी बाळगून उत्तर गुजरातमधील वाघपुरा हे गाव सोडलं. भरत देसाई यांच्यासह गुजरातमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील दोन महिलांसह एकूण नऊ जण बेपत्ता आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.आपलं मूळ गाव सोडून उत्तर गुजरातमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ही लोकं अमेरिकेसाठी रवाना झाली.

आधी नेदरलँड आणि नंतर डोमिनिकन रिपब्लिकचा अधिकृत व्हिसा घेऊन अमेरिकेत वर्क परमिट मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते निघाले होते, परंतु डॉमिनिकन रिपब्लिकनंतर कॅरिबियन देशांच्या मार्गे अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्याशी संपर्क तुटला.

बेपत्ता झालेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांनी एजंटशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र आपल्यासोबत विश्वासघात आणि फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे कुटुंबियांनी आपल्या नातेवाईकांचा शोध लागावा यासाठी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली. या संपूर्ण प्रकरणावर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

प्रकरण न्यायालयात असल्याने पीडित कुटुंबियांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

गुजरात उच्च न्यायालयात काय कारवाई झाली?

14 डिसेंबर 2023 रोजी गुजरात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर सादर केलं.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने न्यायालयाला सांगितलं की, कॅरेबियन देशांतील भारताच्या विविध दूतावासांनी गुजरातमधून बेपत्ता झालेल्या या नऊ व्यक्तींचा शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.

“माझा भाऊ भरत देसाई याने अमेरिकेला जाण्यासाठी 8 जानेवारी रोजी आमचं गाव सोडलं आणि 4 फेब्रुवारी 2023 रोजी तो नेदरलँड मार्गे डॉमिनिकन रिपब्लिकला पोहोचला,” असं प्रांतिज येथील वाघपुरा गावातील बेपत्ता व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे चुलत भाऊ असलेले शैलेश देसाई यांनी बीबीसीला सांगितलं.

“4 फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं, त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही. एक वर्ष उटलून गेलं तरी त्यांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या भरत यांची पत्नी चेतनाबेन देसाई यांनी ही माहिती 12 जुलै 2023 रोजी स्थानिक पोलिसांना दिली. एजंटविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.”

गुजरात हाय कोर्ट

फोटो स्रोत,GETTY IMAGES गुजरात उच्च न्यायालय

शैलेश देसाई म्हणाले, “भरतभाईंचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. ते गावात शेती आणि पशुपालन करत असंत. एका मित्राच्या माध्यमातून ते दिव्येशभाई या एजंटच्या संपर्कात आले. दिव्येश यांनी त्यांना अमेरिकेत वर्क परमिट मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.”

“आपल्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या घराची आणि कुटुंबाची परिस्थिती आता खूपच गंभीर आहे. त्यांची पत्नी आणि मुलं आर्थिक विवंचनेचा आणि मानसिकदृष्ट्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत.”

“भरतभाईंनी नातेवाइकांकडून 20 लाख रुपये उसने घेऊन एजंटला दिले होते. उरलेले 50 लाख रुपये तिथे पोहोचल्यानंतर द्यायचे होते.”

“पोलीसात तक्रार दाखल करूनही त्यांची काहीच खुशाली कळालेली नाही. आता न्यायालयाकडूनच आम्हाला एखाद्या चांगल्या बातमीची आशा आहे.”

सुनीलभाईंनी भावाचा पत्ता मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले?

मेहसाणा तालुक्यातील हेदुवा गावचे मूळ रहिवासी असलेले आणि अमेरिकेला जाताना बेपत्ता झालेले सुधीर पटेल

यांचा धाकटा भाऊ सुनील पटेल यांनी बीबीसीला सांगितलं की, “माझ्या भावाशी मी 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 1 च्या सुमारास शेवटचं बोललो होतो, त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.”

“अमेरिकेत वर्क परमिट मिळवून देईन, असं एजंटने माझ्या भावाला सांगितलं होतं. या घटनेनंतर आमच्या हे लक्षात आलं की, माझ्या भावाला अमेरिकेला बेकायदेशीरपणे नेलं जात होतं.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या भावाने बीएससी केमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं आहे. मेहसाणा हायवेवर आमचं एक हॉटेल आहे. हे हॉटेल माझा भाऊ आणि वडील चालवत असंत. माझा भाऊ गेल्यानंतर आता हॉटेल मी सांभाळतोय.”

निराश व्यक्ती

फोटो स्रोत,GETTY IMAGES

“माझा भाऊ गेल्यानंतर घर, समाज आणि हॉटेलची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. माझ्या भावाशी संपर्क होणं बंद झाल्यापासून माझी आई सतत खूप रडत असते.”

“सतत काळजी करत राहिल्याने ती आजारी पडते. माझ्या आईचं आयुष्य जणू काही एके ठिकाणी थांबलंय. ती बोलत राहते, ‘माझं माझ्या मुलाशी बोलणं करून द्या.’ आपल्या देशात तो कुठेही हरवलेला असेल तर आम्ही हातची सर्व कामं टाकून त्याचा शोध घेऊ. मग आमचा कितीही पैसा त्यात खर्च झाला तरी चालेल.

“तो कुठे आहे याची आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही घरोघरी जाऊन त्याचा शोध घेऊ, पण इथे आम्ही अंधारात चाचपडतोय अशी स्थिती आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमचा एजंट आम्हाला या प्रकरणी खोटी उत्तरं देत होता. सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आलं की तो तुरुंगात आहे, पण नंतर आम्हाला कळलं की तो खोटं बोलतोय.”

मुलीशी संपर्क होत नसल्याने वडील चिंतेत

गांधीनगर जिल्ह्यातील सारधव गावचे मूळ रहिवासी आणि बेपत्ता अवनीबेहनचे वडील जितेंद्रभाई पटेल बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “माझ्या मुलीने अहमदाबादच्या जी. जे. महाविद्यालयामधून ‘बीसीए’चं शिक्षण घेतलं आहे. माझी मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. तिला स्टॉक मार्केट फर्ममध्ये नोकरीही मिळाली होती. ती नोकरीसुद्धा करत होती. ती चांगले पैसे कमवत होती, पण मला माहित नाही अमेरिकेला जाण्याचं भूत तिच्या मानगुटीवर कुठून बसलं.”

ते पुढे म्हणतात, “माझ्या मुलीशी मी 4 फेब्रुवारी 2023 रोजी शेवटचं बोललो होतो. सध्या उच्च न्यायालयात एक जनहित याचिका सुरू आहे. प्रत्येक तारखेला काहीतरी चांगली बातमी येईल अशी आम्हाला आशा असते, पण आमच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.”

“आपल्या देशात नोकरीची सुरक्षितता नाही. सरकारी नियमानुसार वेतनही मिळत नाही. कामाचे तास जास्त आहेत आणि त्यातुलनेत वेतन कमी मिळतं. त्यामुळे तरुणांना पाश्चिमात्य देशांमध्ये जाण्याची ओढ लागलेली आहे.”, असंही ते पुढे म्हणाले.

वृद्ध व्यक्ती

फोटो स्रोत,GETTY IMAGES

जितेंद्र पटेल सांगतात, “आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये परदेशात जाण्याची क्रेझ आहे. दर तिसऱ्या दिवशी पाच जण परदेशात जातात. प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती परदेशात आहे. आता नवीन पिढी शैक्षणिक व्हिसावर परदेशात जाते.”

आपल्या मुलीला भेटण्यासाठी आसुसलेले वडील मोठ्या अभिमानाने सांगतात, “माझी मुलगी खूप बोलकी आणि सरळ स्वभावाची होती. दिवस-रात्र आम्ही तिचा विचार करतो. आम्ही रोज विचार करतो की तिला कसं आणि कुठे शोधता येईल.”

मूळचे अहमदाबाद शहरातील रहिवासी असलेले आणि बेपत्ता निखिल पटेल यांचे भाऊ केतनभाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याविषयी आता काही बोलायचं राहिलेलं नाही.

त्यांनी याबाबत अधिक बोलण्याचं टाळलं.

कोण आहेत बेपत्ता?

मूळचे गांधीनगरमधील नरदीपूर गावचे रहिवासी असलेले ध्रुवराज सिंगचे वडील बलवंत सिंग बीबीसीशी बोलताना म्हणाले, “2 फेब्रुवारी 2023 रोजी माझ्या मुलाशी मी शेवटचं बोललो. मला एकूण तीन मुलं आहेत. एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.”

“माझी तीन एकर जमीन आहे. मी शेतकरी आहे. ध्रुव हा माझा दुसरा मुलगा आहे. त्याला स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी अमेरिकेला जायचं होतं. त्याला घरातून बाहेर पाठवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता पण त्याला जायचं होतं, त्यामुळे आम्ही त्याला परवानगी दिली.”

महिला

फोटो स्रोत,GETTY IMAGES

या संपूर्ण घटनेत पीडितांच्या कुटुंबीयांनी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून परदेशी भूमीवर बेपत्ता झालेल्या नऊ जणांचे प्राण वाचवण्यासाठी संबंधितांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

या संपूर्ण घटनेत बेपत्ता असलेल्या लोकांची नावं पुढीलप्रमाणे आहेत;

1. भरत देसाई, प्रांतिज, वाघपुरा

2. अंकित कांती पटेल, कलोल, गांधीनगर

3. किरणकुमार तुलसी पटेल, अबलियासन, मेहसाणा

4. अवनी जितेंद्रकुमार पटेल, सरधव, गांधीनगर

5. सुधीरकुमार हसमुख पटेल, हेदुवा, मेहसाणा

6. प्रतीकभाई हेमंत पटेल, उत्तरसांडा, नडियाद

7. निखिल कुमार प्रल्हाद पटेल, सिपोर, मेहसाणा

8. चंपा फतेसिंग वसावा, मेहसाणा, आबलियासन

9. ध्रुवराजसिंग बलवंतसिंग वाघेला, नरदीपूर, गांधीनगर

उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर काय प्रतिक्रिया आली?

गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी 2023 रोजी गुजरातमधील नऊ जण अहमदाबाद विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. हे सर्व नऊ जण एकत्र जमले होते.

ते मुंबईहून नेदरलँडला गेले. तिथून ते डॉमिनिकन रिपब्लिकला गेले आणि काही दिवस तिथेच थांबले होते.

तिथून ते अँटिग्वाला रवाना झाले.

कुटुंबातील सदस्यांनी फेब्रुवारीमध्ये या लोकांशी शेवटचा संपर्क साधल्यानंतर, 12 जुलै 2023 रोजी पीडित भरत देसाईंची पत्नी चेतना यांनी साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज पोलिस ठाण्यात एजंटांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.

याशिवाय, 15 जुलै 2023 रोजी पीडित सुधीर पटेल यांचा भाऊ सुनील यांनी मेहसाणा तालुका पोलिस ठाण्यात एजंटांविरुद्ध तक्रार नोंदवली.

22 जुलै 2023 रोजी पीडितांच्या कुटुंबियांच्या कायदेशीर पथकाने डॉमिनिकन रिपब्लिकमधील भारतीय राजदूतांना पत्र लिहून पीडितांची माहिती मागवली.

ज्यामध्ये, 26 जुलै 2023 रोजी डोमिनिकन रिपब्लिक सरकारने याविषयी आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. यानंतर, पीडित कुटुंबियांच्या कायदेशीर पथकाने 3 ऑगस्ट 2023 रोजी फ्रान्स आणि अमेरिकेतील भारतीय राजदूतांना 9 जण बेपत्ता झाल्याची माहिती दिली.

भारतीय दूतावासाने या पीडितांना त्यांच्या तुरुंगात, निर्वासितांच्या छावण्यांमध्ये किंवा बेकायदेशीरपणे कुठेही ठेवलेलं असल्यास फ्रेंच अधिकाऱ्यांना कळवण्यास सांगितलं.

परंतु, फ्रान्स सरकारने भारतीय दूतावासाला कळवलं की, पीडित व्यक्ती ग्वाडेलूप आणि मार्टीनिक या दोन ठिकाणी असल्यास ते येथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असतील.

जनहित याचिकेनुसार, यानंतर पीडितांच्या कुटुंबियांपैकी एकाच्या कायदेशीर पथकाने निदर्शनास आणून दिलं की त्यांना ग्वाडेलूप येथील तुरुंगात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु तिथे संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.

पतीच्या शोधात असलेल्या चेतनाबेन काय म्हणतात?

पीडित चेतनाबेन देसाई यांनी 12 जुलै 2023 रोजी प्रांतिज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, “दिव्येश कुमार उर्फ जॉनी मनोजकुमार पटेल हा सात महिन्यांपूर्वी आमच्या घरी आला होता.”

“तो गेल्यानंतर तिचा नवरा भरत देसाई म्हणाला, तो त्याला व्हिसावर अमेरिकेला घेऊन जाणार आहे. त्यासाठी ७० लाख रुपये लागतील.”

“त्यांनी नातेवाईकांकडून 20 लाख रुपये उधार घेऊन दिव्येशभाईंना दिले.”

“8 जानेवारी 2023 रोजी माझ्या पतीचं तिकीट आलं.”

“यानंतर, माझ्या पतीला त्याच्या दोन भावांनी अहमदाबाद विमानतळावर सोडलं आणि त्यांनी एजंट दिव्येश यांची भेट घेतली.“माझे पती भरत देसाई अहमदाबादहून मुंबईला गेले होते आणि त्यांनी सांगितलं की ते मुंबईहून नेदरलँडला जात आहेत.”“दुसऱ्या दिवशी चार वाजता ते नेदरलँडमधील अॅमस्टरडॅमला पोहोचले. त्यांनी फोनवर सांगितलं की ते चार-पाच दिवस स्पेनमध्ये राहणार आहेत.”

“यानंतर ते पोर्ट ऑफ स्पेन येथे पोहोचले. 15 दिवस स्पेनमध्ये राहिल्यानंतर डॉमिनिकनला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माझे पती डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये पोहोचले आणि तिथे 15 दिवस मुक्कामाला होते. मी दररोज त्यांच्याशी बोलत असे.”

“मात्र फेब्रुवारी 2023 पासून मी माझ्या पतीशी बोललेले नाही.”

“यानंतर माझ्या ओळखीच्यांना मी एजंट दिव्येश यांना भेटण्यासाठी पाठवलं, तर त्यांनी आणखी एका एजंट महेंद्र पटेल उर्फ एमडी यांच्याशी भेट घालून दिली.”

“तिथे त्यांनी माहिती दिली की भरत देसाई सध्या मार्टिनिक येथे आहेत.”

“त्यांनी दिलासा दिला की, त्यांच्यासोबत आणखी काही माणसं आहेत जे सर्वजण 15 दिवसात अमेरिकेला पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलता येईल.”

“परंतु, सात महिने झाले तरी अद्याप माझ्या पतीशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. या एजंटांकडून आमचा विश्वासघात आणि फसवणूक झाली आहे.”

एजंट कोण आहे आणि कोणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे?

याशिवाय 14 जुलै 2023 रोजी सुनील पटेल यांनी मेहसाणा पोलीस ठाण्यात आपला मोठा भाऊ सुधीर पटेल यांना अमेरिकेला पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

त्यातही दिव्येश उर्फ जॉनी पटेल याने 75 लाख रुपयांत अधिकृतरीत्या अमेरिकेला नेण्याआधी 10 लाख रुपये आगाऊ घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली आहे.

बेपत्ता झालेल्या भरत देसाई यांच्या प्रांत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपास सध्या साबरकांठा एसओजी टीम करत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपी दिव्येश उर्फ जॉनी पटेल आणि चतुर पटेल यांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेले दोन्ही आरोपी सध्या जामिनावर असून उर्वरित तीन आरोपी वॉण्टेड आहेत. वॉन्टेड आरोपी अमेरिकेत पळून गेल्याचा संशय आहे.याप्रकरणी दिव्येश पटेल उर्फ जॉनी, शैलेश पटेल आणि महेंद्र पटेल उर्फ एमडी या तीन एजंटांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वॉण्टेड आरोपींमध्ये महेंद्र उर्फ एमडी पटेल, धवल पटेल आणि विजय पटेल यांचा समावेश आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button