नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू
नांदेड,21- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले असून या अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली आहे.
या अभियानात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास, विद्यार्थी केंद्रित आरोग्य व आर्थिक कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. शाळा ही सर्वांगीण दृष्ट्या समृद्ध करणे, शाळेचा परिसर तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त करणे, तंत्रज्ञानाच्या वापरातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृद्ध करणे यावर भर देण्यात येत आहे.
सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना या अभियानात सहभागी करण्यात येत आहे. प्राथमिक ते राज्यस्तरापर्यंत वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्या त्या स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश त्यामध्ये आहे.प्राथमिक स्तरावर केंद्रप्रमुख हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
जिल्हास्तरावरील मूल्यांकनाचे काम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मूल्यांकन समिती करणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अन्य सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची स्वतंत्र वर्गवारी केली जाणार आहे .
जिल्ह्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.
शालेय वातावरण आकर्षक करणे, भौतिक सुविधांची निर्मिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, अध्ययन अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परिसर स्वच्छता, व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा विकास,आरोग्य जपणूक आणि विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे या अभियानाची उद्दिष्टे आहेत.