अशोकराव चव्हाणांच्या बदनामीचा डाव उघडकीस मराठा व धनगर आरक्षणाबाबत खोटी पत्रे, पोलिसात तक्रार
नांदेड, दि. २४ नोव्हेंबर २०२३: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बदनामी करण्याचा आणखी एक डाव उघडकीस आला असून, मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांच्या नावाची दोन बनावट पत्रे तयार करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांना दिली आहे.
चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतानाच्या काळातील कोरे लेटरपॅड तयार करून त्यावर आपल्या नावाची बनावट पत्रे लिहिण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या नावाच्या बनावट पत्रांचा पहिला प्रकार सुमारे ९ महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले ते बनावट पत्र मराठा आरक्षणाविषयी होते. त्याबाबत चव्हाण यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशी दोन बनावट पत्रे तयार केली आहेत. त्यातील एक पत्र मराठा आरक्षणाबाबत तर दुसरे पत्र धनगर आरक्षणाबाबत आहे. या दोन्ही खोट्या पत्रांमध्ये माझी भूमिका आरक्षणाविरोधी भासवण्यात आल्याचे चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आगामी काळात अनेक निवडणुका असून, त्याअनुषंगाने माझ्याविषयी गैरसमज निर्माण करून बदनामी करण्याचे, राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन करण्याचे हे कारस्थान आहे. पुढील काळात देखील अशाच प्रकारची काही खोटी पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांना त्यांनी दोन बनावट पत्रांची प्रतही दिली आहे. सदरहू प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे