कोकणच्या धर्तीवर मराठवाड्यातही खासगी बसच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची मागणी
नांदेड दि.7- गणेशोत्सवाच्या काळात पुणे ,मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असते. त्यावेळी खासगी बसचालकांकडून तिकीट दराच्या माध्यमातून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. त्याच धर्तीवर दिवाळीत नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांनाही ट्रॅव्हलच्या अतिरिक्त दर वाढीचा फटका बसू नये, यासाठी शासनाने कोकणच्या धर्तीवर मराठवाड्यातील खाजगी बस वाहतुकीवर तिकिट दर नियंत्रण ठेवावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
खाजगी बस ट्रॅव्हलचे दर एरवी नांदेड -मुंबईसाठी 700 ते 900, नांदेड -पुणे 500 ते 700 तर नांदेड -नागपूरसाठी 500 ते 600 असे आहेत. परंतु आता या दरांमध्ये खाजगी बसचालकांनी भरमसाठ वाढ केली असून मुंबई-पुण्याहून नांदेडकडे येणाऱ्या प्रवाशांना अडीच ते तीनपट अधिक दराने 2 हजार रुपयांपर्यंत प्रवास भाडे आकारण्यात येत आहे.
मराठवाड्यातील अनेकजण शासकीय ,खाजगी नोकरी ,शिक्षण व व्यवसायासाठी मुंबई,पुणे ,नागपूरसह विविध मोठ्या शहरात राहतात. दिवाळीत मोठ्या संख्येने नागरिक मूळ गावी, नातेवाईकांकडे जातात. त्यामुळे प्रवाश्यांची गर्दी वाढते. त्याचा गैरफायदा ट्रॅव्हल्स कंपन्या घेत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स कंपन्या एरवीच्या तुलनेत तिकिटाच्या दरात अडीच ते तीनपट वाढ केल्याचे दिसून येत आहे. रेल्वेचे आरक्षण फुल,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही पुरेशा नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे ,मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असते. त्यावेळी खाजगी बसचालकांकडून तिकीट दराच्या माध्यमातून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. जर हे नियंत्रण मुंबई आणि कोकणात ठेवण्यात येत असेल तर मग मराठवाडा व विदर्भाला शासन दुसरा न्याय का देते? असा सवाल करत त्याच धर्तीवर दिवाळीत नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांनाही ट्रॅव्हलच्या अतिरिक्त दर वाढीचा फटका बसू नये यासाठी शासनाने अपेक्षित उपाय योजना करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.