गजानन गिरी आणि साजिद अली यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथील प्रादेशीक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर गिरी आणि आणि साजिद अली यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
मोटार वाहन निरिक्षक मनोज पन्नालाल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मागील 4 वर्षापासून नांदेड परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक गजानन गिरी आणि पीयुसी सेंटरचे संचालक साजिद अली मुनवर अली यांची चांगली ओळख आहे. गजानन गिरी यांचा भोकर येथील नातेवाईक विरेंद्र गिरी याच्या ड्रायव्हींग स्कुलची तपासणी केली असता कायद्याप्रमाणे तरतुदी पुर्ण नव्हत्या म्हणून त्याचा नकारात्मक अहवाल दिला.
1 नोव्हेंबर रोजी मी माझे मोटार वाहन निरिक्षक मित्र पंकज यादव, मित्र राजेश शिंदे, माधव बिदगे आणि परिवहन विभागातील कंत्राटी चालक श्रावण जाधव असे सर्व जण नमस्कार चौक येथे एकत्र भेटलो आणि भोजन करण्यासाठी बाहेर जात होतो. त्यावेळी पंकज यादव यांच्या मोबाईलवर गजानन गिरी याने फोन करून श्रीराम वजन काटा सांगवी येथे गजानन केशव गिरी, साजिद आली मुनवर अली आम्ही असे थांबवले आहोत असे सांगितले तेव्हा आम्ही त्यांना भेटलो. तेव्हा त्या दोघांनी आम्हाला भोजनासाठी सोबत चलण्याचे निमंत्रण दिले. पण आम्ही अगोदरच नियोजन करून आलो आहोत म्हणून येणार नाही असे सांगितले. तेंव्हा माझ्या जातीचा उल्लेख करून या दोघांनी भरपूर शिवीगाळ केली. काठी हातात घेवून मला मारण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पंकज यादव यांनी ती काठी आपल्या हाताने अडवली त्यात त्यांच्या उजव्या करंगळीच्या बाजूला फ्रैक्चर झाले आहे.
आम्ही नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात गेलो तेंव्हा पोलीसांनी आम्हाला मेडीकल पत्रक आणण्यास सांगितले आमची मनस्थिती ठिक नव्हती आम्ही घाबरलो होतो म्हणून आज तक्रार देत आहोत असे तक्रारीत लिहिले आहे. त्याप्रमाणे विमानतळ पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 323, 504, 506, 294, 34 सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित (जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कलम 3(1) (आर), 3(1) (एस), 3(2), 3 (व्ही) प्रमाणे गुन्हा क्रमाक 357/2023 गजानन केशव गिरी आणि साजिद अली मुनवर अली या दोघांविरुध्द दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला आहे असे पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिले असून त्यावर पोलीस अंमलदार पोलीस ठाणे विमानतळ यांची स्वाक्षरी आहे.