जल जीवन मिशन अंतर्गत कामांचे केंद्रीय पथकांकडून कौतुक कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त
नांदेड,4- जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या कामांना नुकतेच जलशक्ती मंत्रालयामार्फत श्री संजीव कुमार बोरडोलोई (आसाम) व श्रीमती विनिता (केर आदी सदस्य पथकांनी जिल्ह्यातील एकूण 16 नळ पाणीपुरवठा योजनांची पाहणी करून आपला अभिप्राय केंद्र शासनास सादर केला.
त्यात प्रामुख्याने कामांचा दर्जा, गुणवत्ता, साहित्य तपासणी अहवाल, काँक्रीट टेस्ट अहवाल, पाईपाचे थर्ड पार्टी अहवाल, पाणी गुणवत्ता चाचणी अहवाल, टाटा कन्सल्टन्सी त्रयस्त यंत्रणे कडून कामांची झालेली तपासणी करून दिलेला अहवाल, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती झालेल्या संवाद, कामांची रंगरंगोटी, कार्यात्मक नळ जोडणी, स्त्रोतांचे उद्भव या सर्व बाबींचे सविस्तर पाहणी करून केंद्र शासनास अहवाल पाठवला आहे. कामांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांचे कौतुक केले आहे.
नांदेड जिल्ह्याला कार्यात्मक नळ जोडणीचे एकूण 5 लाख 36 हजार 341 इतके उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 3 लाख 81 हजार 981 इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. शिल्लक 1 लाख 54 हजार 360 इतके उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अमोल पाटील हे जिल्ह्यातील सर्व अभियंते, सर्व कंत्राटदार, वँपकॉस कंपनीकडील सर्व अभियंते यांच्या बैठका घेऊन युद्धपातळीवर कामे हाती घेतले आहेत. येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत 100% नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सूक्ष्म नियोजन केले आहे. तसेच योजनेच्या कामांकरिता नामांकित व मजिप्रा मान्यता प्राप्त पाईप, योग्य खोली, योजनांची रंगरंगोटी, दर्जा उत्तम राखण्यात येत असून या कामी वँपकॉस कंपनी व टाटा कन्सल्टन्सीचे थर्ड पार्टी अहवालाकरिता जिल्ह्यातील अभियंत्यांची योग्य समन्वय ठेवून कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. येत्या सहा महिन्यात आणखी गती वाढवून सूक्ष्म नियोजनाद्वारे जलजीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.