क्राईम
अरफाह टूर अँड ट्रॅव्हल्स चे मलिक इब्राहीम दफेदार इरफान दफेदार यांचा विरूद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड, दि. 3 : मुस्लिम समाजात हज यात्रेला प्रचंड महत्व आहे. आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी असे समाजातील प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी पदरमोड करुन पैसे जमा केले जातात. परंतु हज यात्रेच्या नावाखाली भाविकांना गंडा घालण्याचे प्रकार अनेक घडत आहेत. कधी हजयात्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सकडून फसवणूक केली जाते तर कधी एजंट फसवतात.
अशाच एका ६० वर्षाच्या व्यक्तीला हज यात्रेच्या नावाने आठ लाख रुपयाला गंडा
घातल्याची घटना इतवारा भागात घडली. दोघा जणांविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सईद अहमदखान अली अहेमद खान पठाण (५९) हे इतवारा भागातील घोडा गल्ली परिसरात राहतात. हज यात्रेला जाण्यासाठी त्यांनी जीवनभराची कमाई आठ लाख रुपये पदरमोड करुन जमवली. हज यात्रा घडवून आणतो म्हणून इब्राहीम दफेदार (अयान टॉवर, इतवारा), इरफान दफेदार (देगलूर नाका) या दोघांनी सईद अहमदखान
यांच्याकडील आठ लाख रुपये काढून घेतले. हा सर्व व्यवहार अरफाह टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स येथे झाला. हज यात्रा तर दूरच राहिली. परंतु दिलेले आठ लाख रुपये देण्यास त्या दोघांनी टाळाटाळ केली. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर सईद अहेमदखान यांनी इतवारा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या प्रकरणी इरफान दफेवार, इब्राहीम दफेवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि कुंडगीर हे करत आहेत